Reviews

वाडा चिरेबंदी by Mahesh Elkunchwar

merqri's review

Go to review page

4.0

एखाद्याच व्यक्तीला सरळसरळ खलनायक न करता विविध लोकांमधले ताणतणाव उलगडत नेणाऱ्या कलाकृतींमध्ये वाडा चिरेबंदीचं नाव घेता येईल. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. अजाणताही मतं बनत जातात, पूर्वग्रह घट्ट होत जातात.

धरणगावकर देशपांडय़ांच्या घरातले कर्ते पुरुष तात्याजी वृद्धापकाळानं मरण पावलेत. मुंबईला असलेला मधला मुलगा सुधीर वगळता देशपांडे कुटुंब गावातच वास्तव्य करून असलेलं. सुधीरला कळवूनही तो अंत्यसंस्कारावेळी पोहोचू शकला नव्हता. सुधीर-अंजली तिथं पोहोचल्यावर साहजिकच पुढची इस्टेटीची निरवानिरव लावली जावी अशी प्रत्येकास आस लागून राहिलेली.

पैशांचं सोंग आणता येत नाही. वाण्याकडे उधारी आहे तो सामान उचलू देत नाही. तात्यांचे शेवटचे विधी तर करायला हवेत. सुधीरला उसनवारीने सगळं केलेलं नकोय. मुंबईला राहून व्यवहार आणि थोडासा कोरडेपणा त्याच्यात मुरलेला. भास्करला गावीच राहताना नंतरचे इभ्रतीचे प्रश्न भेडसावतायत. मोठा मुलगा म्हणून जबाबदारीच ओझं निभावताना स्वतःकडे थोडसं झुकतं माप घ्यायला त्याला अयोग्य वाटत नाही. हे दोघे सोडले तरी अजून दोन भावंडं. त्यांच्यापरीने त्यांची मनस्थितीसुध्दा दुर्लक्ष न करण्याजोगी. पुढच्या पिढीचे जनरेशन गॅप चे प्रॉब्लेम्स वेगळेच.

वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपापल्या अचल ध्रुवांवरून इतरांना जोखतात, त्यांच्याबद्दल मतं बनवतात. संवाद कमी किंवा चाचपडतच. एकाच घरात राहणीमानाची, मूल्यांची दरी रुंदावत असताना ह्या वाड्याला चिरेबंदी म्हणणं हा खचितच विरोधाभास.

हे आहे हे असं आहे. गावा-गावातून थोड्या फार फरकाने ह्या कहाण्या सगळीकडेच. हे कसं चुकलय, समाज कसा चुकतोय हे तात्पर्य सुचवणारा शेवट नाही. किंबहुना नाटकाचं नाव आणि त्यातला आशय ह्या विरोधाभासातच वाचणाऱ्याने उपरोध ओळखावा. अर्थात तो उपरोध असलाच पाहिजे असा अंगावरही येत नाही.

अनेक व्यक्तिरेखा असूनही उण्यापुऱ्या १०० पानांच्या आत प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय दिलेला जाणवतो. वयस्कर दादी ते सर्वांत लहान रंजू, सगळ्यांची प्रेक्षकातील कोणावरतरी नक्कीच छाप पडेल, त्या व्यक्तिरेखेत जणू आपल्यालाच प्रेक्षक शोधेल आणि इथेच नाटकाचं यश आहे. कुठलाही अभिनिवेश न आणता समाजाला आरसा दाखवणाऱ्या अश्या कलाकृती म्हणूनच रसिकप्रिय आणि अभिजनप्रिय ह्या कसोट्यांवर खऱ्या उतरतात.
More...